ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते तथा धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातील आनंदाश्रम येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शिवसैनिकांसह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत संघटना उभारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कायम तत्पर राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
यावेळी आनंद दिघे यांच्या कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत आनंद दिघे यांचे मार्गदर्शन आणि विचार महत्त्वाचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या. पुण्यतिथीनिमित्त आनंदाश्रम परिसरात दिवसभर शिवसैनिक आणि समर्थकांची उपस्थिती दिसून आली.
