लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा-वाकेड घाटात तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने हरियाणा येथील जीप कंपास वाहन सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. वाहनात एक महिला व एक पुरुष असे दोन प्रवासी होते. सुदैवाने दोघेही सुखरूप बचावले असून, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वाकेड घाटातील तीव्र वळणावरून वाहन जात असताना चालकाचा अंदाज चुकल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळले. वाहन दरीत गेल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याची पाहणी केली. पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे, पोलीस कॉन्स्टेबल उमाजी बजागे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, ११२ क्रमांकाचे वाहनही घटनास्थळी पोहोचले. दरीत अडकलेल्या दोन्ही प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना ११२ वाहनातून लांजा येथे उपचारासाठी नेण्यात आले. दोन्ही प्रवाशांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती मिळाली.
अपघातग्रस्त वाहन सुमारे ७० फूट खोल दरीत असल्याने ते बाहेर काढण्यासाठी मोठ्या क्रेनची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत वाहन बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अखेर रात्री सुमारे अकराच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने जीप दरीतून बाहेर काढण्यात आली. यावेळी हायवे वाहतूक पोलीस तसेच ११२ पथक घटनास्थळी उपस्थित होते.
वाहन बाहेर काढण्याच्या कामात जिजाऊ संस्थेचे तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ आणि निलेश जाधव यांनीही सहकार्य केले. स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने वाहन सुरक्षितपणे बाहेर काढून वाकेड पेट्रोल पंप परिसरात ठेवण्यात आले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाकेड घाटातील धोकादायक वळणांवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालविण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
