मंडणगड : वेसवी-धबधबा परिसरातील चिंचेच्या झाडाखाली बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या व्यक्तीवर बाणकोट सागरी पोलिसांनी कारवाई केली. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशूल लक्ष्मण जोशी (वय ४४, रा. वाल्मिकी नगर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.२० वाजता मौजे वेसवी येथील धबधब्याजवळ चिंचेच्या झाडाखाली बेकायदेशीररीत्या विनापरवाना हातभट्टीची दारू तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रामराव पवार यांनी फिर्याद दिली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ५०० रुपये किमतीची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच दारू तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त केले आहे. पुढील तपास बाणकोट सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.
बाणकोटमध्ये हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई…
