चिपळूण : चिपळूणच्या आर्थिक आणि सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चिपळूण अर्बन बँकेच्या यशस्वी वाटचालीचे कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती चंद्रकांत भोजने यांनी मनःपूर्वक कौतुक केले. गुरुवारी त्यांनी चिपळूण अर्बन बँकेच्या स्वमालकीच्या नूतन वास्तूस सदिच्छा भेट देत बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली.

चिपळूण अर्बन बँकेच्या स्वमालकीच्या नूतन वास्तूचे काही महिन्यांपूर्वी दिमाखात उद्घाटन झाले. अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त जागा आणि ग्राहकाभिमुख बँकिंग सेवांसह उभारण्यात आलेल्या या वास्तूमुळे बँकेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगपती चंद्रकांत भोजने यांनी गुरुवारी बँकेस भेट देऊन बँकेच्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती घेतली.

यावेळी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मोहन मिरगल यांचा वाढदिवस असल्याने चंद्रकांत भोजने यांनी त्यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेच्या प्रगतीबाबत चर्चा करताना त्यांनी अर्बन बँक कोकणात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याचे विशेष कौतुक केले.

चिपळूण अर्बन बँकेने ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत विविध बँकिंग योजना, सेवा आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. स्थानिक ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती भोजने यांनी जाणून घेतली. बँकेची वाढती विश्वासार्हता, कार्यपद्धती आणि भविष्यातील वाटचाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

अध्यक्ष मोहन मिरगल यांच्या नेतृत्वाखाली बँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून, बँकेच्या संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांच्या योगदानाचेही यावेळी कौतुक करण्यात आले. स्थानिक पातळीवर ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि विश्वासाच्या बळावर बँकेने आपले स्थान अधिक भक्कम केले असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या सदिच्छा भेटीमुळे चिपळूण अर्बन बँकेच्या कार्याला उद्योजक क्षेत्रातून मिळालेली प्रशंसा आणि शुभेच्छा यामुळे बँकेच्या आगामी वाटचालीला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.

यावेळी उद्योजक चंद्रकांत भोजने, अमोल भोजने, भाऊ दळी, निहार गुडेकर, सतीश खेडेकर, दीपा देवळेकर यांच्यासह बँकेचे पदाधिकारी, हितचिंतक आणि मान्यवर उपस्थित होते.

फोटो : चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मोहन मिरगल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना उद्योजक चंद्रकांत भोजने, अमोल भोजने, भाऊ दळी, निहार गुडेकर, सतीश खेडेकर, दीपा देवळेकर व मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत