दापोली :- आपल्या प्रभावी वाणीने, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि विचारांची समर्थ मांडणी करत संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोलीच्या विद्यार्थिनींनी कै. मृणाल हेगशेट्ये जिल्हास्तरीय इंग्रजी माध्यम वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
जिल्हास्तरीय स्तरावर झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी कु. जान्हवी काशीराम देवघरे हिने “My Expectations of Freedom in a Democracy” या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर करत तृतीय क्रमांक मिळविला. लोकशाही, स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या अपेक्षा यांची विचारपूर्ण मांडणी करत तिने आपल्या वक्तृत्वाची वेगळी छाप पाडली.
याच स्पर्धेत कु. रिद्धी दत्ताराम चोगले हिने “Experiments with Truth and I” या विषयावर आत्मविश्वासाने व उत्कृष्ट शैलीत विचार मांडत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. दोन्ही विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशासाठी विद्यार्थिनींनी घेतलेली मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि विषयाची केलेली सखोल तयारी महत्त्वाची ठरली. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
या दैदिप्यमान यशाबद्दल ज्ञानदीप दापोली संस्थेचे सचिव श्री. सुजय मेहता यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. “मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याला योग्य दिशा दिली, तर यश निश्चितच मिळते. जान्हवी आणि रिद्धी यांनी मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संस्थाध्यक्षा, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकवृंद यांनीही जान्हवी देवघरे व रिद्धी चोगले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वक्तृत्वाच्या बळावर जिल्हास्तरावर झळकल्या संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोलीच्या विद्यार्थिनी…
