लांजा: सध्या मोबाईलचे सर्वांना आकर्षण आहे, मात्र त्याचा चुकीचा वापर आपल्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतो. त्यामुळे या वयात मोबाईलचा वापर न करता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आता तुमचं उभरत वय असून याच वयात तुम्ही आपले ध्येय ठरवले पाहिजे आणि ठरवलेले ध्येय गाठलात तर भविष्य सुरक्षित होईल, असे प्रतिपादन लांजाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले.
लांजा शहरातील अल-अमिन उर्दू हायस्कूल येथे रत्नागिरी पोलीस दला तर्फे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततता, सजगता आणि स्वसंरक्षण अभियान मिशन रायझिंग फ्लॉवर्स अंतर्गत लांजा पोलीस ठाणेच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला, यावेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे बोलत होते. पुढे बोलताना बगळे म्हणाले की, इंटरनेटच्या जाळ्याच्या माध्यमातून आपण एकमेकांना कनेक्ट होतो. पण असे कनेक्ट होत असताना आपण आपल्या सुरक्षिततेबाबत जागरूक असायला हवे. अन्यथा आर्थिक फसवणूक किंवा अन्य वेगवेगळ्या बाबतीत आपली फसवणूक होऊ शकते.
अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियावर ओळख झाली आणि आपण त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकलो तर परिणामी भविष्यात मोठे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती असते. तसेच तरुण वयात अंमली पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच्या पासून या वयात दूर राहणे अतिशय आवश्यक आहे. कारण अंमली पदार्थ सेवन करायची सवय लागल्यास जे काही अंमली पदार्थ असतील ते आपल्या मेंदूवर ताबा मिळवतात आणि एकदा आपण आहारी गेलो की त्याची सवय सुटत नाही.
एकदा व्यसन लागले की ते आपल्याला सोडवत नाही, जो पर्यंत आपलं आयुष्य उध्वस्त होत नाही तो पर्यंत ते सुटत नाही. अखेर व्यसन नाहीच सुटले तर शेवटी आपल्याला हे जग, आयुष्य सगळे नातेवाईक यांना सोडून कायमस्वरूपी जावे लागते. त्यामुळे कोणत्याही अंमली पदार्थांच्या आहारी जाताना आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार करा, असे आवाहन निळकंठ बगळे यांनी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा व इंटरनेटचा वापर करताना सुरक्षितेबाबत जागरु असणे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, अनोळखी व्यक्ती सोबतच्या ओळखीचे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांची ऑनलाईन ग्रुमिंग, वाहतूकिचे नियम, प्रवास करताना घ्यावयाची काळजी, आत्मसुरक्षा अशा विविध विषयांवर निळकंठ बगळे यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, यावेळी अल-अमिन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.ए.सय्यद, सहा.शिक्षिका खदिजा मुलाणी, फौजिया मुन्शी, शहानवाज जमादार, अनिसा शेख, अशफाक पावस्कर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच आभार सहा.शिक्षिका खदिजा मुलाणी यांनी मानले.