गुहागर : एस.टी. महामंडळाचा कारभार आणि प्रवाशांचे हाल हे समीकरण काही नवीन नाही. पण आता डिजिटल युगात प्रवाशांना स्मार्ट बनवण्याच्या नादात त्यांचा खिसा कसा कापला जातोय, याचा एक धक्कादायक प्रकार गुहागरमधून समोर आला आहे…
शासनाने महिलांना ५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत जाहीर केली खरी, पण गुहागर आगाराच्या भोंगळ कारभारामुळे या सवलती कागदावरच राहिल्या आहेत. प्रवाशांना कार्ड दिलं गेलंय,पण ते रिचार्ज कुठे करायचं? कसं वापरायचं? याची कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाने दिलेली नाही.परिणामी,कार्ड खिशात असूनही प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागतोय…
याच अनागोंदी कारभाराविरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. प्रवाशांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गुहागर आगार व्यवस्थापकांना गाठून जाब विचारला.
सिद्धीताई सुर्वे यांनी आगार व्यवस्थापकांकडे रिचार्जची अधिकृत प्रक्रिया तात्काळ जाहीर करण्याची आणि प्रवाशांची लूट थांबवण्याची मागणी केली आहे. जर यामध्ये तातडीने सुधारणा झाली नाही, तर गुहागर आगारात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युवा सेनेने दिला आहे.