मंडणगड :सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निसर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रानभाज्या महोत्सवा’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे संचालक श्री. संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री. वैभव कोकाटे यांची विशेष उपस्थिती लाभली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ.संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, डॉ. शैलेश भैसारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करुन रानभाज्याचे आहारातील महत्व तसेच उपयुक्त जीवनसत्वे याबाबत आपल्या सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. संतोष चव्हाण यांनी या रानभाज्याचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि याचे दररोजच्या आहारातील महत्व, या रानभाज्या का खाव्या याविषयी मार्गदर्शन केले.
या महोत्सवामध्ये विद्यार्थांनी अनेक प्रकारच्या रानभाज्या ठेवल्या होत्या. यामध्ये करटोली, अळू, भारंगी, टाकळा, शेवगा, धांडगी, आगाडा, विचका, दिंडा, कूर्डू, सुरण या भाज्यांचा समावेश होता. विद्यार्थांनी या विविध रानभाज्यांची थोडक्यात ओळख करुन घेतली.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी सांगितले की पावसाळयात जंगलात व शेतात नैसर्गिकरीत्या विविध रानभाज्या उगवत असतात. या रानभाज्यांमध्ये ओैषधी गुण, तसेच आपल्या शरीरास आवश्यक असणारे जीवनसत्वे, खनिजे, कॅलशियम आणि तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात. हया भाज्या नैसर्गिकरीत्या वाढत असल्यामुळे त्यावर कोणतीही रासायनिक किटकनाशके किंवा खते फवारलेली नसतात. हया रानभाज्यांची ओळख पुढील पिढीला होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या महोत्सवाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला. शेवटी डॉ. विनोदकुमार चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.