मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ व तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव तालुक्यात उज्ज्वल केले आहे.
मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडा शिक्षक गौतम माने व संजय अवेरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये चमकदार यश संपादन केले.

बुद्धिबळ स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या गटात इन्शा सर्फराज हिने प्रथम, इरा सय्यद हिने द्वितीय, समृद्धी खैरे हिने तृतीय, तर श्रावणी अबगुल हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अमान सय्यद याने प्रथम, तर गुरुदास दळवी याने पाचवा क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात समाधान कांगणे याने तृतीय क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात देव बैकर याने प्रथम, तर संस्कार सापटे याने तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
तायक्वांदो स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आराध्या कोळंबेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या ३५ किलो वजन गटात प्रशिक आदेश मर्चंडे व कार्तिक कोळेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच ४१ किलो वजन गटात अर्णव जाधव याने प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात कृष्णा शाही याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ४५ किलो वजन गटात वेदांत दुर्गवले आणि ५१ किलो वजन गटात अथर्व भोपणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलींच्या ३२ किलो वजन गटात आरुषी पंदिरकर हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर ५५ किलो वजन गटात वेदिका वाळुंज हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय यशामुळे शाळेसह मंडणगड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजेत्या सर्व खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. आगामी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.