दापोली, प्रतिनिधी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे ३० मे रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे मंगळवारी (९ जून) उपचारादरम्यान निधन झाले. यापूर्वी याच अपघातात त्यांची पत्नी सुवर्णा मरकड आणि कन्या अनुश्री यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा बळी गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह नगर येथील मूळ गावी सुट्टी घालवून दापोलीकडे परत येत होते. ३० मे रोजी सायंकाळच्या सुमारास पोलादपूर येथे हॉटेल बालाजीजवळ त्यांच्या क्रेटा कारची उभ्या डंपरला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला.
या दुर्घटनेत अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड, या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ सहयोगी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, तसेच त्यांची कन्या अनुश्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते, तर मुलगा चिन्मय याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे.
अपघातानंतर अनिल मरकड यांना पुढील उपचारांसाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होते. मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
या दुर्दैवी घटनेमुळे मरकड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मुलगा चिन्मयच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. सध्या तो आजी-आजोबांसोबत नगर येथे राहत आहे.
दापोली तालुक्यातील जालगाव येथील मंगलभूमी अपार्टमेंटमध्ये मरकड कुटुंब वास्तव्यास होते. अनिल मरकड यांच्या निधनाची बातमी समजताच अपार्टमेंटमधील रहिवासी, कोकण कृषी विद्यापीठातील सहकारी तसेच परिसरातील नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.