खेड : शहरातील गुजरआळी येथील ऐतिहासिक व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दशानेमा मुरली मनोहर मंडळाच्या श्रीकृष्ण मंदिराचा पुनरुत्थान व भव्य जीर्णोद्धार सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर, मंडळाचे पदाधिकारी आणि असंख्य कृष्णभक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.
या ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त संपूर्ण गुजरआळी बाजारपेठेला जणू भक्तीचा साज चढला होता. परिसरात आकर्षक तोरणे, स्वागत कमानी व पताका लावण्यात आल्याने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिर परिसरासह बाजारपेठेतही भाविकांचा उत्साह आणि धार्मिक चैतन्य अनुभवायला मिळाले.सोहळ्यानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विधिवत पूजा-अर्चा, होमहवन, धार्मिक विधी, श्रीमूर्तीची मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण अशा मंगलमय कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि श्रीकृष्णाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मंदिराच्या पुनरुत्थानामुळे भाविकांच्या श्रद्धेला नवी ऊर्जा मिळाली असून, या ऐतिहासिक देवस्थानाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.
या सोहळ्याला मुंबई पुणे शहरासह देश विदेशातील मान्यवरासह उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम तसेच बशीरभाई हजबानी, उद्योजक व भाजप नेते वैभव खेडेकर, शमशुद्दीन मुकादम, श्रीकृष्ण मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संजय मोदी, दशानेमा मुरली मनोहर मंडळाचे उपाध्यक्ष अतुल शेठ, राजेश बुटाला, प्रसाद शेठ, ॲड. समीर शेठ, मिलिंद तलाठी, मदन जाडकर यांच्यासह दशानेमा मुरली मनोहर मंडळ व श्रीकृष्ण मंदिर जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या भव्य जीर्णोद्धार सोहळ्यामुळे खेड शहरातील धार्मिक परंपरेला उजाळा मिळाला. मंदिराचे पुनरुत्थान हा केवळ वास्तूचा जीर्णोद्धार नसून, श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होत भाविकांनी या मंगल सोहळ्याचा भक्तिभावाने आनंद घेतला.
खेडमध्ये श्रीकृष्ण मंदिराचा पुनरुत्थान व जीर्णोद्धार सोहळा भक्तिमय वातावरणात…!
