रत्नागिरी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मा. कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे, तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरसीएफच्या माध्यमातून आवश्यक खतसाठा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.

तालुक्यातील विविध सोसायट्या व कृषी सेवा संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या मागणीप्रमाणे खतांचा पुरवठा करण्यात येत असून शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध व्हावीत यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतत कार्यरत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना युरिया, डीएपी, एनपीके यांसारख्या खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार निकम यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

खरीप हंगाम यशस्वी व्हावा आणि शेतकऱ्यांना वेळेत खतांचा पुरवठा मिळावा यासाठी महायुती सरकार संवेदनशीलपणे कार्यरत असून प्रशासन, कृषी विभाग, आरसीएफ आणि संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक खतांपासून वंचित राहू दिले जाणार नाही, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या हितासाठी शासन व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार निकम यांनी केले.