चिपळूण (प्रतिनिधी): विभा अरविंद ग्रंथालय आणि आपलं चिपळूण या समाजाभिमुख संस्थांच्या सहयोगाने मुंबईस्थित टच सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून बुधवार दि. २४ व २५ जून रोजी गुहागर तालुका येथील विविध माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचलित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय, ग. ज. तथा तात्यासाहेब वझे विद्यामंदिर पाचेरी ,आगार आणि श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर, मुंढर येथील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. दि. २४ व २५ जून रोजी श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकासावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी टच संस्थेचे पदाधिकारी सौ.सुरेखा केळकर,सौ. सुदेष्णा गिरी,सौ. निता पै, श्री.प्रफुल्ल पालांडे तसेच विभा ग्रंथालय चिपळूण चे संचालक श्री.प्रसाद रिसबूड, कार्यवाह श्री.विजय कदम, कार्यकर्ते श्री.सुमित सागवेकर, श्री.सिताराम पडते, तसेच अंजनवेल कॉलेजचे प्राचार्य श्री.मंगेश गोरीवले आणि मुंढर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक श्री. अनंत साठे उपस्थित होते.
या प्रसंगी समुपदेशक श्री.रामचंद्र चव्हाण पाटील, श्री.श्रीमंत शिरोळे आणि श्री.संदीप शिर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात तिन्ही माध्यमिक विद्यालयांतील एकूण १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. “शिक्षण हेच सामर्थ्य” ही संकल्पना ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाचा प्रवाह मागास भागांपर्यंत पोहोचावा आणि येथील विद्यार्थी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावेत, या उदात्त हेतूने संबंधित या संस्था सातत्याने कार्यरत आहेत.
यावेळी विभा अरविंद ग्रंथालय हे केवळ वाचनालय न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे प्रभावी केंद्र बनत असल्याचे पुन्हाएकदा अधोरेखित झाले. ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
टच सामाजिक संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप; ‘विभा अरविंद ग्रंथालय’ व ‘आपलं चिपळूण: यांच्या सहयोगाने गुहागर तालुक्यामध्ये प्रेरणादायी शालेय उपक्रम
