दापोली :- सण-उत्सवाच्या आनंदापासून दूर राहून समाजाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या मनगटावर आज बहिणीच्या प्रेमाची राखी बांधण्यात आली. रक्षाबंधनाचे औचित्य साधून क्षितिज कलामंच, दापोलीच्या महिला सदस्य व बालकलाकारांनी दापोली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमातून पोलीस आणि समाजातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी वर्षभर अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. सण-उत्सवांच्या दिवशीही त्यांना बंदोबस्तासाठी तैनात राहावे लागते. त्यामुळे अनेकदा कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याची संधी त्यांना मिळत नाही. पोलिसांची ही भावना लक्षात घेऊन क्षितिज कलामंचच्या बहिणींनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना राखी बांधली.
राखी बांधल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षितिज कलामंचच्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. सणाच्या दिवशीही कर्तव्य बजावताना कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. अशावेळी बहिणींनी राखी बांधून दिलेल्या प्रेमामुळे कुटुंबीयांची उणीव भासली नाही, अशी भावना पोलिसांनी व्यक्त केली. त्यांच्या या आपुलकीने रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पोलिसांनी क्षितिज कलामंचच्या लहान बहिणींशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पोलीस आणि समाज यांच्यातील विश्वास व आपुलकी वाढविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी क्षितिज कलामंचचे अध्यक्ष अभिजीत भोंगले, उपाध्यक्ष उमाकांत देवघरे, व्यवस्थापक सुनील कदम, सचिव दिगंबर पावसे, वैभव सागवेकर, रुपेश सावंत, कासम मेमन, इब्राहिम हसबा, प्रसाद गुजर, राधेश लिंगायत यांनी परिश्रम घेतले. महिला सदस्या संगीता कदम, दापोली नगरपंचायत नगरसेविका रिया सावंत, शामल केळसकर, उर्मिला देवघरे, सलोनी सागवेकर यांच्यासह लहान मुली व मुलांनी सहभाग घेतला.
दापोलीमधील क्षितिज कलामंचतर्फे पोलीस ठाण्यात रक्षाबंधन…!
