रायगड : स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून रायगडमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्मार्ट मीटर हटवा आणि वाढीव वीजबिले रद्द करा, अशी आक्रमक मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, बसविलेले मीटर हटवावेत आणि ग्राहकांना पूर्वीची बिलिंग पद्धत कायम ठेवावी, अशी भूमिका शेकापने घेतली आहे.
स्मार्ट मीटरच्या कंत्राटापासून ते ग्राहकांवर पडणाऱ्या आर्थिक भारापर्यंत अनेक प्रश्न शेकापने आज अलिबाग इथं आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन्सला सुमारे १३ हजार ८८८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हा खर्च जवळपास २७ हजार ७४० कोटी रुपयांपर्यंत कसा पोहोचला? टेंडरमधील मूळ किंमत आणि प्रत्यक्ष मंजूर रकमेत एवढी मोठी तफावत का निर्माण झाली, याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तर स्मार्ट मीटरच्या अन्यायकारक धोरणाविरोधात लवकरच जनतेच्या व समविचारी पक्ष, संघटना यांच्या सहभागाने उग्र जनाआंदोलन छेडणार, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे. स्मार्ट मीटर विरोधी चळवळ लोकांभिमुख करुन अलिबाग इथं विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा भाई जयंत पाटील यांनी दिला आहे.
यासाठी बारामती-पुणेचे उदाहरणही शेकापने दिले आहे. या ठिकाणी मूळ टेंडरची रक्कम ३ हजार ३१४ कोटी रुपये असताना प्रत्यक्ष मंजूर रक्कम ६ हजार २९४ कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रति मीटर दर ६ हजार ३१८ रुपयांवरून ११ हजार ९९८ रुपये झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.
स्मार्ट मीटर योजनेच्या एकूण खर्चाबाबतही शेकापने सरकारला जाब विचारला आहे. शासन निर्णयानुसार स्मार्ट मीटरसह संपूर्ण योजनेसाठी ३९ हजार ६०२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. या योजनेतील ६० टक्के अनुदान केंद्राकडून आणि उर्वरित ४० टक्के रक्कम महावितरण कर्जाद्वारे उभारणार असल्याचेही म्हटले आहे.
या कर्जाचा भार भविष्यात ग्राहकांच्या वीजबिलांवर पडणार का? ग्राहकांवर नेमका किती आर्थिक भार पडणार आणि राज्य सरकारचा यामध्ये प्रत्यक्ष आर्थिक वाटा किती? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
त्यामुळे स्मार्ट मीटरचा प्रश्न आता केवळ वीजबिलापुरता मर्यादित न राहता टेंडर, खर्चवाढ आणि ग्राहकांवरील संभाव्य आर्थिक भार या मुद्द्यांवरूनही चर्चेत आला आहे. सरकार आणि महावितरण या आरोपांवर काय भूमिका मांडणार, याकडे आता लक्ष लागले आहे. या जनहितार्थ प्रश्नावर सरकार विरोधात भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा सरचिटणीस भाई जयंत पाटील व शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिलाये.