लांजा : कुवे येथील नागरिकांना नगरपंचायतीमधील कामांसाठी लांजा शहरात यावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी कुवे येथे नगरपंचायतीचे कार्यालय सुरू करण्यात आले असून हा प्रश्न मार्गी लावून मी माझे कर्तव्य पूर्ण केले असले तरी कुवे येथील विकासकामे थांबणार नाहीत, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी कुवे येथील नागरिकांना दिला.

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुवे येथे बहुउद्देशीय सभागृहाचा लोकार्पण सोहळा रविवारी सकाळी उत्साहात पार पडला. यावेळी आमदार किरण सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, शिवसेनेचे लांजा-राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्षा सावली कुरुप, उपनगराध्य मिलिंद लांजेकर, गटनेते योगेश कावतकर, बांधकाम सभापती वैभव जोईल, पाणी सभापती रफिक नेवरेकर, पंढरीनाथ मायशेट्ये, मनोहर बाईत, सिद्धेश भुवड, महिला व बालकल्याण सभापती प्रणाली तेली, निधी गुरव, श्रध्दा तोडकरी, सुशिला कांबळे, साक्षी मानकर, दूर्वाभाई शेट्ये, प्रांजली यादव, मधुरा लांजेकर, सचिन डोंगरकर, प्रसाद भाईशेट्ये व जमीन मालक राडये कुटुंबीय उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले की, बहुउद्देशीय सभागृहासाठी १० गुंठे जागा देणे ही साधी गोष्ट नाही. सद्धया जमीन देताना प्रत्येक कुटुंब अनेकदा विचार करते. मात्र, राडये कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत ही जागा उपलब्ध करून दिली, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. लांजा मध्ये आमदार म्हणून काम करताना विविध विकासकामांबाबत अनेक तक्रारी येतात. परंतु या बहुउद्देशीय सभागृहाच्या कामाबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, असे सांगत आमदार सामंत यांनी समाधान व्यक्त केले. तर सभागृहाच्या कामात काही बाबी अपूर्ण असल्यास त्या देखील लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. बहुउद्देशीय सभागृह नागरिकांना नाममात्र भाड्याने उपलब्ध करून देण्याची शाश्वती देतो असे सांगत राडये कुटुंबातील एका व्यक्तीला नगरपंचायती मध्ये कंत्राटी नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सामंत यांनी यावेळी दिली.

त्याचप्रमाणे यावेळी पाणी योजनेबाबत माहिती देताना आमदार सामंत यांनी सांगितले की, लांजा-कुवे परिसरातील पाणी योजनेचे काम मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सोलार ऊर्जेवर ही योजना चालविण्यात येणार असल्याने भविष्यात वीज खर्चात बचत होईल आणि त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. तसेच पाणीपट्टी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तर डीपी प्लॅन संदर्भात कुवे येथे अनेक गैरसमज पसरवले गेले परंतु माझा दृष्टीकोन हा फक्त विकासकामांचा असतो. त्यामुळे विकासकामे करताना कोणताही दुजाभाव माझ्याकडून होणार नाही, कुवे मध्येही विकासकामे होतंच राहतील याची मी खात्री देतो. येणाऱ्या काळात विकासकामांमधून पसरवलेल्या अफवांना उत्तर देण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे शेवटी आमदार सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, कुवे येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचे भूमीपूजन, पोस्ट ऑफिस व बहुउद्देशीय कार्यालयाचे लोकार्पण, नगरपंचायतीच्या कुवे कार्यलयाचा शुभारंभ आदी विकासकांचा सोहळा आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात संपन्न झाला. विशेषतः कुवे येथे नवीन लोकार्पण झालेल्या बहुउद्देशीय सभागृहाकरिता कै.पांडुरंग धोंडू राडये व कै.तुकाराम बाबाजी राडये यांच्या कुटुंबीयांनी १० गुंठे जमीन विनामोबदला उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली. तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिन डोंगरकर, शाम खानविलकर, अशोक गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.