मुंबई- राज्यात दि. १३ ऑगस्टपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे १३ ते २० ऑगस्ट दरम्यान या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याचे संकेत मिळत असून, राज्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत राज्यातील विविध विभागांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. विशेषतः १३ ते २० ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या पट्ट्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते. त्यानंतर २० ते २७ ऑगस्ट दरम्यानही राज्यातील विविध भागांत पावसाची संततधार कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. तसेच चालू महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 13 ऑगस्टपासून राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने 8 ऑगस्टला जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 9 ते 12 ऑगस्टदरम्यानही कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.