मुंबई : राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रात तब्बल ५२६ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यापैकी तब्बल ४५२ शाळा मुंबई विभागातील आहेत. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलरकर यांनी माहितीच्या अधिकारातून मागविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
शासनाची मान्यता तसेच यू-डायस क्रमांक घेणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करून या शाळा सुरू असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी अभय कोलरकर यांना आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
राज्यातील अनधिकृत शाळांपैकी ४३ शाळा बंद करण्यात आल्या असून, १५५ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच ४२१ शाळांना नोटीस बजावण्यात आली अथवा दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक शाळा
मुंबई विभागात नोंद झालेल्या ४५२ अनधिकृत शाळांपैकी २३ शाळा बंद करण्यात आल्या असून, १४९ शाळांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. तर ३९६ शाळांवर नोटीस अथवा दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई विभागातील अनधिकृत शाळांचा प्रश्न गंभीर असल्याचे चित्र आहे.
पुणे विभागात ५३ अनधिकृत शाळांची नोंद झाली असून, त्यापैकी १४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ७ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नागपूर विभागात ११ अनधिकृत शाळा आढळल्या असून, त्यापैकी ५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि ४ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नाशिक विभागात ४ अनधिकृत शाळांची नोंद झाली आहे. अमरावती विभागात २, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ४ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर आणि लातूर विभागात एकाही अनधिकृत शाळेची नोंद झालेली नाही.