श्रीवर्धन : “पाण्याचं मुबलक धन म्हणून ज्या शहराला ‘श्रीवर्धन’ हे नाव लाभलं, त्याच श्रीवर्धनमध्ये आज शुद्ध पाणी अक्षरशः गटारात वाहताना दिसत आहे. तब्बल २३ कोटी रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प, नवीन पाणीपुरवठा योजना आणि त्यावर झालेला मोठा खर्च… पण प्रत्यक्षात नागरिकांच्या पदरी पडली ती पाणीटंचाई, फुटलेल्या पाइपलाइन आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा. नवीन पाणीपुरवठा योजना आज प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेच्या सुरुवातीपासूनच वारंवार पाइपलाइन फुटण्याच्या घटना घडल्या. परिणामी, यंदाच्या मे महिन्याच्या अखेरीस शहराला कधी नव्हे इतकी गंभीर पाणीटंचाई सहन करावी लागली.
पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा काहीसा सुरळीत झाला असला, तरी आता दुसरेच चित्र समोर आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी थेट रस्त्यावर आणि गटारांमध्ये वाहून जात असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला, तर दुसऱ्या बाजूला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. मात्र, या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे, तर गटारात वाहून जाणाऱ्या पाण्याकडेही पालिका प्रशासन कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.
