मंडणगड : मंडणगड आणि दापोली तालुक्यातून नालासोपारा येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी. बससेवा महत्त्वाची ठरत असली, तरी या मार्गावरील बसचे वेळापत्रक, प्रवासातील सोयीसुविधा आणि बसचा दर्जा याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सुमारे आठ तासांच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी साध्या साध्सा ऑडीमरी बसचा वापर होत असल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर प्रवाशांची मागणी आणि भारमान लक्षात घेऊन वातानुकूलित तसेच आधुनिक इलेक्ट्रिक बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.दापोली मंडणगड व नालासोपारा आगार व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज वाटत आहे.
बसफेऱ्यांचे वेळापत्रक आणि प्रवाशांची सोय महत्त्वाची असुन मंडणगड व दापोलीहून नालासोपारा मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि अन्य कारणांसाठी नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्यांचे वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीचे व त्यांच्या गरजा पुर्ण करणारे असणे आवश्यक आहे. बस सुटण्याच्या वेळा, उपलब्ध फेऱ्यांची संख्या आणि प्रवासासाठी लागणारा कालावधी याबाबत स्पष्ट व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
आठ तासांच्या प्रवासात बसच्या दर्जाचा प्रश्न
लांब पल्ल्याच्या प्रवासात बसमधील आसनव्यवस्था, स्वच्छता, आरामदायी प्रवास आणि वाहनांची नियमित देखभाल या बाबींना विशेष महत्त्व असते. मात्र, साध्या बसमधून सलग आठ तास प्रवास करताना प्रवाशांना थकवा आणि गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि आजारी प्रवाशांसाठी आरामदायी बससेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
वातानुकूलित व इलेक्ट्रिक बससेवा सुरू होणार का?
एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्यावर भर दिला जात असताना मंडणगड-दापोली ते नालासोपारा मार्गावरही वातानुकूलित आणि इलेक्ट्रिक बससेवेची शक्यता तपासण्याची गरज आहे. यासाठी या मार्गावरील प्रवाशांची संख्या, प्रत्यक्ष भारमान, प्रवाशांची मागणी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रिक बस सुरू करण्यापूर्वी या लांब पल्ल्याच्या मार्गासाठी वाहनांची क्षमता, चार्जिंगची सुविधा आणि आवश्यक पायाभूत व्यवस्था यांचाही विचार करावा लागणार आहे.
मंडणगड-दापोली आगारांनी लक्ष देण्याची गरज
या मार्गावर सुरू असलेल्या बसफेऱ्यांची संख्या, त्यांचे वेळापत्रक, बसचा प्रकार, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा आणि वाहनांच्या देखभालीबाबत संबंधित आगारांनी स्पष्ट माहिती द्यावी, अशी अपेक्षा आहे. प्रवाशांचे भारमान समाधानकारक असल्यास त्यानुसार बसची संख्या वाढविणे किंवा अधिक आरामदायी बस उपलब्ध करून देण्याचा विचार करणे आवश्यक आहे.
आठ तासांच्या प्रवासात प्रवाशांना दर्जेदार आणि आरामदायी सेवा मिळणार का? मंडणगड व दापोली आगार प्रशासन या मार्गावरील बससेवेचा दर्जा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.