खेड (प्रतिनिधी) : – सध्याच्या युगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झालेला आहे, मात्र आजही कुठे ना कुठे हा प्रामाणिकपणा पहायला मिळाला की जगात आजही अशी मदतीला येणारी माणसे आहेत, याचे समाधान वाटते. खेडमधील रेल्वे कर्मचारी अरविंद वसंत तांबे यांनी हा प्रामाणिकपणा अधोरेखित केला आहे.
येथील कोकण रेल्वेचे कर्मचारी अरविंद तांबे यांना प्रवासादरम्यान रस्त्यात कोणाचातरी पडलेला मोबाईल मिळाला होता., तो त्यांनी येथील पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे यांच्याकडे सुपूर्द केला. श्री.सुर्वे यांनी चौकशी करता हा मोबाईल दापोली तालुक्यातील फणसु – भंडारदरा येथील ग्रामस्थ तेजस अहिरे यांचा असल्याचे समजले. त्यानंतर श्री.सुर्वे यांनी तेजस अहिरे यांना पोलीस ठाण्यात बोलावून खात्री त्यांचा मोबाईल त्यांना सुपूर्द केला. दरम्यान रेल्वे कर्मचारी अरविंद तांबे यांचेही खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे यांच्यामार्फत अभिनंदन करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
खेड येथील कोकण रेल्वे कर्मचारी अरविंद तांबे यांचा प्रामाणिकपणा !
