रत्नागिरी : कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार बाळासाहेब माने यांनी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जबरदस्त खळबळ माजली असून आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे..

विशेष म्हणजे भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हेही बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना सोबत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून माने हे भाजपात घरवासी करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. आता बाळ माने यांनी अचानक माघार घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. आघाडीच्या आदेशानुसार माने यांनी अर्ज मागे घेतला की अन्य काही कारणे आहेत याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. यासंदर्भात दैनिक सागरच्या प्रतिनिधीने बाळ माने यांचीही संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच त्यांच्यासोबत मंत्री राणे असल्यामुळे माने यांची पुढील राजकीय वाटचाल कशी राहील याबाबतही आता वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

दरम्यान माने यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे अन्य उमेदवार ही दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. इतर उमेदवारांनी ही अर्ज मागे घेतल्यास महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.