चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येविरोधात चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी गुरुवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कारभाराचा निषेध केला. महामार्गावरील बहादूर शेख नाका परिसरात खड्ड्यात उभे राहत त्यांनी खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना चुना लावायचाच असेल तर खड्ड्यांनाही लावा असे म्हणत प्रतीकात्मक स्वरूपात चुन्याचा डबा भेट देत संताप व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाच्या ॲप्रोच रोडवर पावसाळा सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केवळ खडी टाकून त्यांची तात्पुरती दुरुस्ती केली जात आहे. मात्र पावसाचे पाणी आणि सततची वाहनांची वर्दळ यामुळे हे खड्डे अवघ्या दोन दिवसांत पुन्हा उघडे पडत असल्याचा आरोप मुकादम यांनी केला.
यावेळी त्यांनी, ‘अधिकारी जनतेला खड्डे भरण्याच्या नावाखाली चुना लावत आहेत. त्यामुळे आम्हीही त्यांना प्रतीकात्मक स्वरूपात चुना भेट देत आहोत, असे सांगत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका केली. त्यांच्या या आंदोलनामुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली. दरम्यान, उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले.
शहरातील तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून खड्डे बुजविण्याऐवजी उन्हाळ्यात दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांची कामे करण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
खड्ड्यांमध्ये उभे राहून शौकत मुकादम यांचे अनोखे आंदोलनचुना… लावायचाच असेल तर खड्ड्यांनाही लावा…राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना चुना भेट देत निषेध…
