चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते-धामणंद मार्गाची दिवसेंदिवस होत चाललेली दुरवस्था आणि पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेला संभाव्य धोका लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला थेट जाब विचारला.

रस्त्यावरील खड्डे, तुटलेले कडे, साचलेली माती, गटारांची झालेली दयनीय अवस्था आणि साफसफाईच्या अभावामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

यासंदर्भात कार्यकारी अभियंता, बांधकाम भवन, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण यांना पावसाळ्यापूर्वी कळंबस्ते-धामणंद रस्त्याची तात्काळ डागडुजी, दुरुस्ती आणि संपूर्ण साफसफाई करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.