माथेरान : उन्हाळी पर्यटन हंगामात,पर्यटकांची मांदियाळी असताना आता नवीन समस्येने माथेरानकरांची झोप उडवली आहे.मागील एक महिन्यापासून अनियमित पाणी पुरवठा सुरू असून त्याचा परिणाम गडद होताना दिसत आहे.आता पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
माथेरान मधील लोकसंख्या कमी असली तरी पर्यटक संख्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी लोक येतात या सर्वांना पाणी तर हवेच पण हेच पाणी आता येथील स्थानिक आणि हॉटेलवाल्यांच्या डोळ्यातून येण्याची वेळ आली आहे.नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा करणारे पंप तसेच जुम्मापट्टी,वॉटर पाईप,तसेच माथेरान मधील पंप अतिशय जीर्ण झाले असून ते आता सतत बंद पडू लागले आहेत.
शारलोट तलावातून डिसेंबर महिन्यापासून पाणी उपसा सुरू ठेवल्यामुळे त्याच्या झळा एप्रिल आणि मे महिन्यात बसू लागल्या आहेत.शारलोट तलावातील पाण्याने तळ गाठला असून आता फक्त चिखल दिसत आहे.त्यामुळे कधी एक दिवस तर कधी दोन दिवस माथेरानकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होत आहे.जर पाऊस लांबला तर मात्र येथील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते मात्र ही परिस्थिती सावरण्यासाठी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाकडून कोणतीही हालचाल नसून एकही अधिकारी माथेरानच्या कार्यालयात आपले आसन गरम करायला येत नाही.त्यामुळे माथेरान मध्ये अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप आहे.