देवरूख : घराजवळील खोपीतून जेवणासाठी लाकडे काढत असताना साप चावल्याने एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरी देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनुसया लहु शिगवण (वय ७५ वर्षे, रा. ताम्हाणे कुळ्येवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास अनुसया शिगवण या त्यांच्या घराशेजारी असलेल्या खोपीतून जेवणासाठी लाकडे काढत होत्या. त्यावेळी त्यांना अचानक सर्पदंश झाला. हा प्रकार लक्षात येताच वाडीतील प्रथमेश प्रभाकर कानसरे आणि इतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ रिक्षातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेबाबत देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १६/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.