चिपळूण : बी. टी. जलतरण तलाव, माणगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चिपळूण च्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपल्या जलतरण कौशल्याचा ठसा उमटवला.
या स्पर्धेत 6 वर्षे वयोगटात अकॅडमीच्या खेळाडूंनी 2 पदके मिळवली. मुलींच्या 25 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात साईशा प्रसाद परब हिने सुवर्ण पदक पटकावत प्रथम क्रमांक मिळवला. तर मुलांच्या 25 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सात्विक सचिन धुमाळ याने कांस्य पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत ओवी कोरडे, आयेशा फकीर, अमिना फकीर, क्रिशा शिर्के, संकल्प मोरे आणि सिद्धांश चव्हाण या खेळाडूंनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवला.
या सर्व यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय जलतरणपटू आणि NIS प्रशिक्षक स्नेहा सदाशिव रहाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रामतीर्थ जलतरण तलाव, चिपळूण चे व्यवस्थापक श्री. प्रितम जाधव यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी मधील लहान वयातील खेळाडूंची ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे.
सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या जलतरणपटूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावली सुवर्ण आणि कांस्य पदके ….
