चिपळूण : तालुका जनसंपर्क कार्यालय परिसर शुक्रवारी दुमदुमून गेला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अर्थात हिरक महोत्सवानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुका व शहरच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा केवळ एका राजकीय पक्षाचा वर्धापन दिन नव्हता, तर मराठी अस्मिता, हिंदुत्व, स्वाभिमान, संघर्ष आणि निष्ठेच्या सहा दशकांच्या अखंड प्रवासाचा गौरवसोहळा होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “बाळासाहेब ठाकरे अमर राहो” अशा घोषणांनी परिसर भगवामय झाला.

कार्यक्रमात बोलताना चिपळूण शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम यांनी शिवसेनेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “गेली सहा दशके असंख्य शिवसैनिकांनी तळागाळात राबून, संघर्ष करून आणि अनेक संकटांना सामोरे जाऊन शिवसेना वाढवली आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज हा हिरक महोत्सव साजरा करण्याचा मान आपल्याला मिळत आहे,” असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक राजू भागवत, सुधीरभाऊ शिंदे, राजूशेठ देवळेकर आणि संजय रेडीज यांचा विशेष सन्मान करण्यात आला.