
चिपळूण : शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेत, “३५” वर्षे अविरत, एकनिष्ठ आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या चिपळूण शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित अपर्णा अशोक मेहेंदळे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका “सौ. मुग्धा विजय चक्रदेव”यांचा सेवानिवृत्ती निमित्त विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
श्री देव विठ्ठल मंदिर खेंड-पाचमाडकर मंडळाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांना सेवानिवृत्ती नंतरच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “सौ. चक्रदेव मॅडम यांनी ३५ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे. त्यांचे शिस्तबद्ध, प्रेमळ आणि संस्कारक्षम शिक्षण कार्य हे नव्या पिढीसाठी आदर्श आहे. त्यांची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि तळमळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.”
या सत्कार सोहळ्याला मंडळाचे अध्यक्ष प्रफुलभाई टाकळे, उपाध्यक्ष सागर गांधी, सेक्रेटरी सुहास चव्हाण यांच्यासह सदस्य विजय चक्रदेव, निलेश गांधी, कुसुमाकर (काका) कापडी, सचिन साडविलकर, परेश गांधी आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी सौ. मुग्धा चक्रदेव यांचे अभिनंदन करून त्यांना निरोगी, आनंदी आणि समृद्ध सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.