मंडणगड – येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.संदीप निर्वाण यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून रसायनशास्त्रातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी हे संशोधन कार्य पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयातील संशोधक मार्गदर्शक डॉ. सुशीलकुमार धनमने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह-मार्गदर्शक डॉ. विजय तडके यांच्या सहकार्याने पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा विषय “क्रोमीन आणि झँथीन व्युत्पन्नांचे संश्लेषण, गुणधर्म निश्चिती आणि त्यांचे उपयोग” हा होता.
त्यांच्या संशोधनाचा मुख्य भर ‘ग्रीन कॅटॅलिटिक’ (पर्यावरणपूरक उत्प्रेरक) पद्धतींचा वापर करून क्रोमीन आणि झँथीन व्युत्पन्न तयार करण्यासाठी कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि शाश्वत संश्लेषण पद्धती विकसित करण्यावर होता. या अभ्यासात ‘मल्टी-कंपोनंट ऑरगॅनिक रिअॅक्शन्स’साठी (बहु-घटक सेंद्रिय अभिक्रिया) नैसर्गिक स्रोतांपासून मिळवलेल्या आणि ‘सपोर्टेड’ उत्प्रेरकांचा, विशेषतः कोकोनट सीड कोट ॲश’ याचा वापर तपासण्यात आला. अभ्यासाचा एक भाग म्हणून संश्लेषित केलेल्या संयुगांचे गुणधर्म विविध प्रगत विश्लेषणात्मक आणि स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रांचा वापर करून निश्चित करण्यात आले. तसेच त्यांच्या संभाव्य जैविक उपयोगांचाही अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये विशेषतः जीवाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्मांवर भर देण्यात आला. सेंद्रिय संश्लेषणाच्या पर्यावरणपूरक पद्धती विकसित करण्यात शाश्वत उत्प्रेरक प्रणालींची आशादायक भूमिका या संशोधनातून मांडण्यात आली आहे. ही कामगिरी त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, यामुळे ‘ग्रीन केमिस्ट्री’ (हरित रसायनशास्त्र) आणि ‘शाश्वत सेंद्रिय संश्लेषण’ या क्षेत्रातील पुढील योगदानासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री.श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतीश शेठ, सर्व संस्थापदाधिकारी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभये सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मुंडे महाविद्यालयातील प्रा. संदीप निर्वाण यांना रसायनशास्त्रात पीएच.डी. पदवी प्रदान
