पोलादपूर (शैलेश पालकर)- ग्रामपंचायत वझरवाडीअंतर्गत कलमवाडी येथे पालकमंत्री वनराई बंधारा उपक्रमांतर्गत ग्रामस्थांच्या श्रमसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर यांनी स्वतः उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष श्रमाची जोड देत जलसंधारणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिले. वझरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संभाजी जाधव यांनी पालकमंत्री वनराई बंधारा योजनेचे पाच बंधारे बांधण्याचा संकल्प जाहीर केला.

यावेळी पंचायत समिती पोलादपूरचे सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, सदस्य अनिल दळवी, विस्तार अधिकारी हंबीर, कृषी अधिकारी धरणे यांच्यासह सहाय्यक कृषी अधिकारी अनिल वलेकर उपस्थित होते. पं.स.सभापती अविनाश शिंदे यांनी श्रीफळ वाढवून लोकार्पण केले तर उपसभापती अनिता भिलारे व सदस्य अनिल दळवी यांनी जलपूजन केले.

यावेळी पोलादपूर तालुक्यातील तहसीलदार कपिल घोरपडे व रायगड जिल्हा परिषदेचे क्रीडा अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे आदींनी या पालकमंत्री वनराई बंधाऱ्याची पाहणी केली. वझरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच संभाजी चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत अधिकारी वर्षा अनिल पवार, उपसरपंच वंदना केशव जाधव, ग्रामपंचायत सदस्य संगीता घोलप, विठ्ठल उतेकर आणि ग्रामस्थ विष्णुबुवा जाधव व ज्ञानेश्वर (माऊली) गिराम यांच्यासह इतर मान्यवरांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.

या उपक्रमात सुरेश पवार, गणपत जाधव, गणेश पवार, गणेश जाधव, शीतल जाधव, सुनीता शिवाजी जाधव, सजना शिंदे, निलेश सुतार, प्रदीप सुतार, सुधाकर जाधव, नारायण घोलप, मनीष शिंदे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी स्वदेश फाउंडेशनचे सुजल अहिरे यांचेही सहकार्य लाभले.

पालकमंत्री वनराई बंधारा योजनेंतर्गत सुमारे दीड ते दोन हजार पिशव्या भरून यशस्वी केलेल्या वनराई बंधाऱ्यात तब्बल दोन लाख लिटर पाणी अडविण्यात यश आल्याबद्दल पं.स. सदस्य अनिल दळवी यांनी ग्रामस्थांना धन्यवाद दिले तर उपसभापती अनिता भिलारे यांनी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या संकल्पनेतून कलमवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदान करून वनराई बंधारा बांधल्याबद्दल आभार मानले.

याप्रसंगी वझरवाडीचे सरपंच संभाजी जाधव यांनी, कलमवाडीतील वनराई बंधाऱ्यासारखेच आणखी चार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प केला असून संभाव्य पाणीटंचाईला सक्षमपणे सामोरे जाण्यात वझरवाडी ग्रामस्थ यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला.