सावर्डे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, तसेच अंगणवाडीतील बालकांच्या शैक्षणिक विकासाचा पाया भक्कम व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शहरांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांनाही डिजिटल शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) लॅब आणि ५० अंगणवाड्यांना अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कोयना भूकंप पुनर्वसन निधी २०२५-२६ अंतर्गत एकूण १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.
सावर्डे येथील आमदार निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात शैक्षणिक साहित्यवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली.
या निधीमधून १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्हीआर लॅब उभारण्यासाठी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्गात बसूनच सूर्यमाला, समुद्रतळ, ऐतिहासिक किल्ले आणि मानवी शरीराची अंतर्गत रचना यांसारख्या विषयांचा त्रिमितीय स्वरूपात अनुभव घेता येणार आहे. विज्ञान, गणित, भूगोल आणि इतिहास यांसारखे विषय अधिक रंजक आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढून त्यांची आकलनशक्ती विकसित होण्यास हातभार लागेल.
तसेच चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील ५० अंगणवाड्यांसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून स्मार्ट अँड्रॉइड सिस्टीम, डिजिटल शैक्षणिक कार्यक्रम, थ्रीडी पुस्तके, शैक्षणिक कार्ड्स, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह मॅट, संगीत यंत्रणा आणि अन्य आधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. खेळातून आणि कृतीतून शिक्षणाची गोडी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आमदार शेखर निकम म्हणाले, शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनुभवाधारित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. अंगणवयातील बालकांना लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. उपलब्ध करून दिलेल्या साहित्याचा शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी प्रभावीपणे वापर करावा. ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक सुविधांमधील दरी कमी करून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविणे, हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जयंत शेठ खताते, नितीन ठसाळे, गटशिक्षणाधिकारी निर्णय, देसाई, संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी परीट, अशोकभाई कदम, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, रमेश राणे, पंचायत समिती उपसभापती प्रफुल्ल बाईत, राजेंद्र पोमेंडकर, राजेंद्र सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य शौकतभाई माखजनकर, मंगेश बांडागळे, बैकर मॅडम, सुवरे मॅडम, घवाळी मॅडम, पंकज साळवी, दिशा दाभोळकर, मेघा इंगवले, गणपत चव्हाण, जमीर मुल्लाजी, सावर्डे सरपंच बागवे मॅडम, अशोक काजरोळकर, जागृती शिंदे, मयूर खेतले, शरद शिगवण, आदिती देशपांडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.
ग्रामीण शिक्षणात डिजिटल क्रांती घडवणार! आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश; १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर…
