खेड : कोकणातील बहुसंख्य समाज असलेल्या कुणबी समाजामध्ये लग्नविधी व अंत्यविधींसंदर्भात अनेक अनिष्ट रूढी-परंपरा प्रचलित होत्या. या रूढी-परंपरांमुळे समाजाचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याने अनेकांच्या मनात प्रश्न व मतभेद होते. या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड मुंबई व खेड ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे येथील जोगळे बंधू मल्टिपर्पज हॉल येथे एकदिवसीय “कुणबी परिषद २०२६” आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष अनिलजी नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, माजी शिक्षण सभापती, जिल्हा परिषद रत्नागिरी सहदेव बेटकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश मांडवकर, शिवराज्य संघटना महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तथा ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते ॲड. रोशन पाटील, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विजय थोरे, सचिन धाडवे, जि. प. सदस्य, संघाचे सहसचिव माधव कांबळे, युवा सरचिटणीस सचिन रामाणे, कुणबी विवाह मंडळ सरचिटणीस राजेश मेटकर, संघाचे कार्यकारिणी सदस्य व प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील विवाह समारंभातील रूढी, परंपरा व चालीरीती तसेच मृत्यूनंतरचे विधी आणि त्यामागील सामाजिक व धार्मिक पैलू यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेला तालुक्यातील समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने कुणबी समाजबांधव तसेच समाजाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मुक्त चर्चा, विचारमंथन आणि विविध सूचनांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेच्या निर्मूलनाबाबत राज्य शासनाने दिनांक २२ मे २०२२ रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्याप्रमाणे समाजाने विचारविनिमय करून अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिषदेत घेण्यात आला.
तसेच सामाजिक समारंभांवरील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये लग्नसमारंभात डीजे वाजवण्यास बंदी, प्री-वेडिंग कार्यक्रम, विवाहसोहळ्यात मांसाहार व मद्य देण्यास बंदी, ओटी भरण्यासाठी साडी देण्याची प्रथा बंद करणे, तसेच मंगळाष्टके म्हणताना तांदळाऐवजी फुलांचा वापर करणे इत्यादीचा समावेश आहे. साखरपुडा कमी खर्चात व मर्यादित उपस्थितीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला.या निर्णयांमुळे विवाह समारंभ अधिक साधेपणाने व कमी खर्चात पार पडतील तसेच समाजाची प्रतिष्ठा व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी ॲड. रोशन पाटील यांनी विवाह समारंभातील विविध प्रथा, त्यांचे सामाजिक परिणाम आणि काळानुरूप आवश्यक बदल याविषयी मार्गदर्शन केले.
विजय थोरे यांनी मृत्यूनंतरच्या विधी, सामाजिक जबाबदाऱ्या आणि अनावश्यक खर्च टाळून समाजहित जपण्यासाठी आपले विचार मांडले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिलजी नवगणे, सरचिटणीस कृष्णा वणे, माजी शिक्षण सभापती जि. प. रत्नागिरीचे सहदेव बेटकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी परिषदेचे महत्त्व, समाज संघटन, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर बाईत होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून कृष्णा आग्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
खेड ग्रामीण शाखेचे सचिव सचिन गोवळकर यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले तसेच मुंबई शाखा सचिव संदीप दोडेकर व ग्रामीण खजिनदार सुधीर वैराग, ग्रामीण युवा अध्यक्ष सुरज जोगळे, महिला अध्यक्ष ममता भुवड इत्यादीनी परिषदेतील दोन्ही विषयांवर प्रभावीपणे चर्चा घडवून आणली.
या परिषदेत समाजातील जेष्ठ, महिला, युवक तसेच विविध गावांतील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेत विधायक चर्चा केली.
परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड मुंबई, खेड ग्रामीण, युवा मुंबई व ग्रामीण शाखा आणि महिला शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन खेड ग्रामीण शाखेचे सहसचिव बाळू सनगरे यांनी आपल्या खास शैलीत केले.