दापोली : ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी सखी’ गटामार्फत धातोंडी वाडी येथे प्रमुख शेती व फळपिकांवरील ‘एकात्मिक रोग व्यवस्थापन’ (IDM) या विषयावर प्रात्यक्षिक उत्साहात पार पडले. परिसरातील पिकांवरील रोगांची ओळख पटवून देणे आणि त्यांच्या प्रभावी व पर्यावरणपूरक नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
​प्रमुख पिकांवरील रोग व मार्गदर्शन:
प्रात्यक्षिकादरम्यान कृषी सखी गटातील विद्यार्थिनींनी तक्ते आणि छायाचित्रांच्या साहाय्याने सोप्या भाषेत पुढील पिकांविषयी मार्गदर्शन केले:
​भात: कडा करपा व जिवाणूजन्य पान करपा रोगाची लक्षणे सांगून निरोगी बियाणे वापरणे, रोपांमध्ये योग्य अंतर ठेवणे आणि नत्राचा अतिवापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला.
​नाचणी: नाचणीवरील मान करपा आणि पानावरील करपा या रोगांची लक्षणे चित्रांद्वारे समजावून सांगण्यात आली.
​आंबा: भुरी, अँथ्रॅकनोज आणि बांडगुळ या रोगांची पाने, फुले व फळांवरील लक्षणे दाखवून बागेची स्वच्छता राखणे, रोगग्रस्त भाग छाटणे व शिफारशीत औषध फवारणीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
​नारळ: कोंब कुजणे (Bud Rot) या रोगासाठी पाण्याचा योग्य निचरा, स्वच्छता आणि संतुलित खतांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
​सुपारी: फळकूज (कोलेरोगा) या रोगाचे व्यवस्थापन, शेतस्वच्छता आणि वेळेवर करावयाच्या उपाययोजना पटवून देण्यात आल्या.
​प्रात्यक्षिकाचे स्वरूप:
कृषी सखी गटातील प्रत्येक सदस्याने रोगकारक, लक्षणे, अनुकूल वातावरण आणि प्रतिबंधात्मक उपायांची सविस्तर माहिती तयार केली होती. केवळ रासायनिक औषधांवर अवलंबून न राहता सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक आणि भौतिक पद्धतींचा मेळ घालणाऱ्या एकात्मिक दृष्टिकोनावर भर देण्यात आला. उपक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
​आयोजक व मार्गदर्शक:
या कार्यक्रमाचे आयोजन कृषी सखी गटातील विद्यार्थिनी कु. शबरी चव्हाण, कु. संजना जंगले, कु. मधुजा घडशी, कु. पायल मोरे, कु. रिंकू बाजीया, कु. तरला श्रीदेवी, कु. दिविलीयू, कु. देवीप्रिया पी. टी., कु. श्रीलया एम., कु. मुस्कान कसोटीया आणि कु. नित्या राज यांनी केले.
​हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुंकरकर, RAWE समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रभारी डॉ. विजय देसाई, विषय तज्ञ डॉ. परेश पोटफोडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमामुळे पिकांचे नुकसान टाळून उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे सहकार्य लाभले आहे.