दापोली :- दापोलीतील यशस्वी उद्योजक तसेच तरुण, उमदे आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्री. प्रमोद हसमुख पांगारकर यांनी दहीहंडीच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे दापोलीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दापोली येथे दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात प्रमोद पांगारकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपच्या प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रमोद पांगारकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका जया साळवी, भाऊ इदाते, संदीप केळकर, अतुल गोदकर, वैशाली इदाते, वैष्णवी वेल्हाळ, बाबू लिंगावळे, रोहित शिंदे, धीरज पटेल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.
प्रमोद पांगारकर हे दापोलीतील उद्योजक म्हणून परिचित असून, त्यांच्या तरुण नेतृत्वाचा आणि उद्योजकीय अनुभवाचा पक्षाला आगामी काळात निश्चितच फायदा होईल, अशी भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे दापोली तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दहीहंडीच्या उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. पक्षाच्या विचारधारेनुसार काम करताना दापोलीच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे योगदान देण्याचा निर्धार प्रमोद पांगारकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रमोद हसमुख पांगारकर यांच्या भाजप प्रवेशामुळे दापोलीच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होणार का? याकडे आता राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या समर्थकांकडूनही या पक्षप्रवेशाचे स्वागत करण्यात आले असून, आगामी काळात त्यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.