मुंबई – सामाजिक अभिसरणाचा विचार मनात ठेवत घट्टपणाने राष्ट्रवादी काँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा भक्कमपणे असल्याचे पहायला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
सामाजिक न्याय व ओबीसी सेलची राज्यस्तरीय बैठक आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला विकास मंडळ सभागृहात पार पडली.
पक्षाच्या उभारणीत अधिक ताकद आणि शक्ती निर्माण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असले पाहिजे असे सांगतानाच दादांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी केलेले काम आणि वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी देत असताना आम्हाला आपल्या पाठीशी उभी करायची ताकद याचा मेळ नक्की घातला जाईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या जिल्हाध्यक्षांच्या व पदाधिकाऱ्यांच्या मनात काय भावना आहेत हे या बैठकीतून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक व ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांचा सन्मान पक्षात राखलाच गेला पाहिजे. शिवाय सर्वच फ्रंटल सेलचे प्रमुख व इतर प्रमुखांचा सन्मान झालाच पाहिजे शिवाय त्यांना पक्षस्तरावर ताकद दिली पाहिजे यामध्ये कुणाच्या मनात दुमत असण्याचे कारण नाही असेही सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय संघटन जे विचारांचे अधिष्ठान घेऊन सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली काम करत आहात. आपल्या पक्षाचा सहभाग वहिनींच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आहे. त्यामुळे सामाजिक न्याय व ओबीसी विभागातील कार्यकर्त्याला शासकीय समित्यांमध्ये सहभागी करण्याचे काम प्रदेशाध्यक्ष म्हणून करेन असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.
शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचे आपण कार्यकर्ते आहोत असं बोलून नुसतं चालणार नाही तर तुम्ही कृतीमध्ये काय काम करता हा त्यातील महत्वाचा गाभा आहे. यावेळी तळा (रायगड) तालुक्यातील गीता जाधव या महिलेला सर्वसाधारण जागेवर पाच हजाराच्या मोठया मताधिक्याने जिल्हा परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आणल्याचे सुनिल तटकरे यांनी उदाहरणार्थ सांगितले. आम्ही सत्तेत बसलो आहोत तर आम्ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांचा घेतलेला हा विचार सर्वांना मानवतो की नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून सिध्द करण्यासाठीच निवडणूका दिल्या त्या निवडणूकातून हे घडत आहे आणि आम्ही यासाठी ही टेस्ट घेतली होती असेही सुनिल तटकरे म्हणाले.
दादांनी मुंबईत बँकेला शक्ती आणि ताकद दिली. सहकारी बँकेचे माध्यमातून संबंध महाराष्ट्रात सहकाराची चळवळ मजबूत करण्यासाठी दादांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणावर होते याबद्दल कुणाच्या मनात तिळमात्र शंका असण्याचे कारण नाही. पण अशावेळी उद्याच्या उभारणीत आपल्याला सर्वांच्या योगदानाची आवश्यकता आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
दादा नसल्यानंतर आपली जबाबदारी नेटाने वाढत आहे. पक्ष उभारणीसाठी सुनेत्रावहिनी यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. दादांच्या पाठीशी पक्षाच्या नेत्यांची जी ताकद उभी केली गेली तीच ताकद वहिनींच्या पाठीशी उभी करत आहोत. यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी राहिल. तुम्ही जेव्हा ती जबाबदारी घ्याल तेव्हा ती तितक्याच ताकदीने सरकारकडून किंवा संघटनेकडून तेवढीच ताकद आपल्या पाठी उभी राहिली पाहिजे हीच भूमिका असणं महत्त्वाचं आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
जातनिहाय जनगणना व्हावी असा आग्रह देशपातळीवर होतोय. लोकसभेच्या सभागृहातही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणून मांडणी करत आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी जो काही प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी मंत्री संजय बनसोडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आणि ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी आपले विचार मांडले. शिवाय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दोन्ही सेलच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर सखोल चर्चा केली.