श्रीवर्धन : श्रीवर्धन शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. सोमजाई मंदिराशेजारी असलेल्या धोंडगल्ली परिसरात आज डोंगरावरून एक भला मोठा दगड थेट वस्तीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र उभी असलेल्या एका दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

श्रीवर्धन शहरात मुसळधार पावसाने थैमान घातले असतानाच गुरुवारी दुपारच्या सुमारास धोंडगल्ली परिसरात भीतीचे वातावरण पसरले. डोंगराच्या उतारावरील माती वाहून गेल्याने सैल झालेला एक प्रचंड दगड थेट घरांच्या बाजूने खाली कोसळला. दगड कोसळताच मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने, ज्या वेळी दगड खाली कोसळला त्या वेळी तेथून कोणीही जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या एका दुचाकीवर हा दगड पडल्याने तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

श्रीवर्धनमधील अनेक वस्त्या डोंगरालगत वसलेल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात माती वाहून जाणे आणि दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होतो. धोंडगल्लीतील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. लेखी आणि तोंडी पाठपुरावा करूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

प्रशासनाकडून दरवर्षी धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना घरे सोडण्याच्या नोटिसा दिल्या जातात. मात्र, त्या भागाच्या सुरक्षेसाठी डोंगराचे स्थिरीकरण किंवा अन्य कोणतीही प्रत्यक्ष सुरक्षेची कामे केली जात नाहीत. ‘नागरिकांनी घरे सोडायची; पण प्रशासनाने सुरक्षा पुरवायची नाही का?’ असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.