मुंबई : आयआयटी मुंबईतील ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे यवतमाळ याचा वसतिगृहात मृत्यू झाला.त्याच्या आई-वडिलांनी थेट आरोप केला आहे की मृत्यूपूर्वी साहिलला संस्थेकडून सातत्याने छळले जात होते आणि जातीय भेदभावाला सामोरे जावे लागत होते. पालकांच्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी समाज माध्यमांच्या द्वारे दिली.

पातोडे यांनी म्हटले की, आयआयटी मुंबईसारख्या देशातील अग्रगण्य संस्थेत दलित बहुजन विद्यार्थ्यांवर होणारे जातीय अत्याचार शृंखला असून अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी आणि आता साहिल वाकोडे ह्याचा संस्थात्मक खून करण्यात आला आहे.ही मालिका संस्थेतील जातीय भेदभाव आहे.या सर्व प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून जातीय छळाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.संस्थेतील डीन व संचालकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा.

आयआयटी मुंबईत जातीय भेदभावाविरोधात ठोस, पारदर्शक यंत्रणा उभारली जावी.जातीवर आधारित भेदभाव, छळ आणि संस्थागत छळवणूक रोखण्यासाठी रोहित वैमूला कायद्याची अंमलबजावणी राज्यात आणि देशात तातडीने करण्यात यावी. अशी मागणीही पातोडे यांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. साहिलच्या न्यायासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.