मुंबई- गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा शासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील टोल नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. या काळात मुंबई-गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशभक्तांचा हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, तसेच त्यांना प्रवासादरम्यान अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत ८ सप्टेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.