चिपळूण : (ललेश कदम)येथील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच कचरा जाळण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्रवेशद्वाराजवळच उभ्या असलेल्या एका महाकाय वृक्षाच्या बुंध्यालगत कागद, पालापाचोळा तसेच प्लास्टिक कचरा जाळला जात असल्याने या झाडाचा बुंधा अर्धवट जळाला आहे. या प्रकारामुळे भविष्यात हा प्रकार असाच सुरू राहेिल्यास हे झाड सुकून कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातच अशा प्रकारे कचरा जाळला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंचायत समितीच्या परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी छोट्या स्वरूपाचा खड्डा तयार करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता कागदपत्रे, पालापाचोळा आणि प्लास्टिक कचरा एकत्र करून जाळला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
विशेष म्हणजे पंचायत समिती इमारतीच्या प्रवेशद्वारालगत तसेच मागील बाजूसही मोठ्या प्रमाणात नियमितपणे कचरा जाळण्याचे प्रकार सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सावलीदार मोठ्या झाडांच्या बुंध्याजवळच कचरा जाळला जात असल्याने त्या झाडांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या झाडांमुळे पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक पंचायत समितीत विविध कामांसाठी येत असतात. या झाडांच्या सावलीत नागरिकांना उभे राहणे, तसेच दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करणे सोयीचे ठरते.
मात्र सध्या या झाडांच्या बुंध्याजवळच कचरा जाळण्याचा प्रकार सुरू असल्याने झाडांचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. मुख्य झाडाबरोबरच शेजारील दुसऱ्या झाडाजवळही कचरा जाळला जात असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पंचायत समिती कार्यालय शहराच्या मध्यवत भागात असून येथून नगरपालिकेची घंटागाडीही दररोज जाते. मात्र ही घंटागाडी सकाळच्या सुमारास येत असल्याने त्या वेळी कचरा देण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कचरा साठवून नंतर जाळण्याचा मार्ग अवलंबला जात असल्याची चर्चा आहे.
परंतु प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा जाळल्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याबरोबरच परिसरात प्रदूषणही वाढत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंचायत समिती प्रशासनाने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन कचरा जाळण्याचा प्रकार थांबवावा आणि योग्य कचरा व्यवस्थापन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चिपळूण पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळच कचरा जाळण्याचा प्रकार; महाकाय वृक्ष धोक्यात, नागरिकांत संताप
