मंडणगड : भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान मंडणगड नगरपंचायतीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मंडणगड तालुक्यात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मंडणगड नगरपंचायतीमधील पाणीपुरवठा समितीचे सभापती सुभाष सापटे, नगरसेवक शैलेश शिवगण आणि नगरसेविका समृद्धीताई शिगवण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपा परिवारात प्रवेश केला.
रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या पुढाकाराने तसेच अजय दळवी आणि मंडणगड तालुका अध्यक्ष दत्ताराम महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.
या वेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. प्रमोद जठार, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे, माजी आमदार विनय नातू, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडणगड तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात व्यापक पद्धतीने काम केले जाणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.