दापोली : दापोली तालुक्याची आमसभा गुरुवारी दापोली शहरातील राधाकृष्ण मंदिर येथे राज्यमंत्री तथा आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती . या सभेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या असमाधानकारक उत्तरांवर राज्यमंत्री योगेश कदम यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामस्थांनीही विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आमसभेत सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महसूल, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, भूमी अभिलेख, वन विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंधारण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, उपजिल्हा रुग्णालय दापोली, पतन विभाग, पोलीस विभाग, सहाय्यक निबंधक, कृषी, क्रीडा, पशु विभाग, खारलँड, जिल्हा परिषद बांधकाम, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामपंचायत, समाजकल्याण, आवास घरकुल योजना, कृषी व विशेष घटक योजना, आरोग्य, स्वच्छ भारत मिशन आणि नगरपंचायत आदी विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजविल्याचे सांगितल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी या कामांची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. खड्डे निकृष्ट पद्धतीने बुजविले असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने रस्ते खोदण्याचे तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वळणे येथील एमआयडीसीसाठी प्रस्तावित सबस्टेशनच्या कामाबाबत दर सात दिवसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, तसेच वाढीव वीजबिलांची महावितरणने स्वतःहून तपासणी करून दुरुस्ती करावी, असेही आमदारांनी सांगितले. महावितरणने दापोली तालुक्यात ६७ किलोमीटर भूमिगत वीजवाहिनीचे काम पूर्ण झाल्याची माहिती दिली.

एसटी महामंडळाकडे दापोलीसाठी आणखी पाच गाड्यांची मागणी करण्यात आली. गणपतीसाठी ५० गाड्या मुंबईला गेल्याने दापोलीकरांची गैरसोय होत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. एखादा प्रवासी असला तरी एसटी फेरी बंद करू नये, असे आमदारांनी सांगितले. एनसीएमसी कार्ड, मद्यपान करून वाहन चालविणारे चालक आणि ऑनलाइन तक्रारींवरील कारवाईचा अहवालही मागविण्यात आला. बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव व शेती उपयोगी जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने अशा ठिकाणी वन विभागाने पिंजरे लावावेत, अशा सूचना आमदार योगेश कदम यांनी दिल्या.

या आमसभेला सभापती उन्मेश राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे , नगराध्यक्ष कृपा घाग, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.