कोल्हापूर : कोल्हापूरकरांची तब्बल 13 महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गुजरातमधील वनतारा येथे नेण्यात आलेल्या ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ हत्तीणीचं नांदणी मठात पुनरागमन झालं आहे. तब्बल 32 तासांचा प्रवास करून शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता माधुरी नांदणीतील तिच्या नवीन निवासस्थानी दाखल झाली.
माधुरीच्या स्वागतासाठी परिसरात रांगोळ्या काढून जय्यत तयारी करण्यात आली होती. तिच्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा केंद्रात फळं, भाज्या, केळीचे खुंट आणि गवत ठेवण्यात आलं होतं. माधुरीच्या स्वागतासाठी मध्यरात्रीच मोठा जनसागर लोटला होता. माधुरीचं दर्शन होताच अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि परिसरात जल्लोष करण्यात आला. सध्या माधुरीला तिच्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा केंद्रात ठेवण्यात आलं आहे.
