खेर्डी : खेर्डी येथील टेरवकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. सध्या या रस्त्याच्या सुमारे ९०० मीटर काँक्रिटीकरणास मंजुरी मिळालेली असून, हा रस्ता खेर्डी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री सुखाई मंदिरापर्यंत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
नदीलगत असलेल्या या रस्त्यावर पावसाळ्यात नदीचे पाणी येत असल्याने डांबरी रस्ता वारंवार खराब होतो. दरवर्षी डांबरीकरण करूनही काही काळातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्यामुळे ग्रामस्थांना तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
खेर्डी हे चिपळूण शहरालगतचे महत्त्वाचे गाव असून, परिसरात एमआयडीसी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी कराड-विजापूर मार्गाच्या धर्तीवर काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. काँक्रिटीकरण झाल्यास पुढील अनेक वर्षे रस्त्याची टिकाऊपणा वाढून नागरिकांना वारंवार होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून दिलासा मिळू शकतो.
यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या सद्यस्थितीची माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिली. निवेदन स्वीकारल्यानंतर चव्हाण यांनी “या प्रस्तावाकडे मी स्वतः लक्ष देईन आणि जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन,” असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यावेळी रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, श्री सुखाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कैलास शेम्बेकर, ट्रस्टी श्री.लक्ष्मण भुरण, विनय दाते, संतोष उतेकर आणि श्रीधर भुरण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या मागणीला प्रत्यक्ष मंजुरी कधी मिळते आणि श्री सुखाई मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणातून कधी साकारतो, याकडे खेर्डी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
९०० मीटर काँक्रिटीकरण मंजूर; खेर्डीचे श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री सुखाई मंदिरापर्यंत रस्ता पूर्ण काँक्रिटीकरण करण्यासाठी ग्रामस्थांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे निधीची थेट मागणी..
