मोरवणे : केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सतर्कता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week – VAW) २०२६ अंतर्गत बँक ऑफ इंडिया, बहादूरशेख नाका शाखेच्या वतीने मोरवणे येथे ग्रामसभा घेण्यात आली.

या ग्रामसभेत ग्रामस्थांना सायबर फसवणूक व डिजिटल बँकिंगमधील संभाव्य धोके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हॅकिंग, फिशिंग, डिजिटल अरेस्ट, UPI फसवणूक, OTP फसवणूक तसेच विविध ऑनलाइन आर्थिक फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच OTP, PIN, पासवर्ड अथवा बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवर्जून सांगण्यात आले.

ग्रामस्थांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), अटल पेन्शन योजना (APY) तसेच विविध शासकीय सामाजिक सुरक्षा व आर्थिक समावेशन योजनांची माहिती देण्यात आली.

बँकेच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सतर्कता, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार प्रतिबंध यांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD), आरोग्य विमा, म्युच्युअल फंड आदी विविध उत्पादने व सेवांची माहिती देऊन त्यांचे फायदे समजावून सांगितले.

शाखेच्या पथकाने ग्रामस्थांना किसान क्रेडिट कार्ड (KCC), किसान वाहन कर्ज, पशुपालन कर्ज, कृषी मुदत कर्ज तसेच इतर कृषी व संलग्न व्यवसायांसाठी उपलब्ध कर्ज सुविधांची माहिती देऊन त्यांची पात्रता व फायदे समजावून सांगितले.

या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या माध्यमातून सायबर सुरक्षितता, सुरक्षित डिजिटल बँकिंग, आर्थिक साक्षरता, शासकीय योजना, बँकिंग सेवा, कृषी वित्तपुरवठा तसेच भ्रष्टाचाराविरोधातील सतर्कता याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.