रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी पक्षवाढीसाठी येणाऱ्या अडीअडचणी, नागरिकांचे प्रश्न, महिला सबलीकरण व सक्षमीकरण, संबंधित विविध विषयांवर सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सविस्तर चर्चा करण्यात आली.

सुप्रियाताईंनी सर्व अडीअडचणी समजून घेतल्या आणि सर्व प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच भेटीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाचे काम जोमाने करण्यासाठी प्रोत्साहन दिले. कधीही कोणतीही अडचण आल्यास थेट मला फोन करा, आपला संपर्क कायम असू द्या, असे त्यांनी सांगितले.

लवकरच कोकणचा दौरा करणार असल्याचे सांगत, आपण सर्वांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी जोमाने प्रयत्न करूया, असा शब्दही सुप्रियाताईंनी पदाधिकाऱ्यांना दिला.

या भेटीदरम्यान महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, प्रदेश उपाध्यक्ष सुजाता तांबे, चिपळूण महिला तालुकाध्यक्ष अमृता आडवीरकर, दापोली महिला तालुकाध्यक्ष निशा सावंत, रत्नागिरी महिला तालुकाध्यक्ष कल्पना भिसे, देवरुख महिला तालुकाध्यक्ष दीपिका किरवे, जिल्हा सरचिटणीस नसीम सय्यद, जिल्हा सरचिटणीस सोनिया लोहिया, जिल्हा सरचिटणीस गीता घाणेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष वैष्णवी शिंदे आणि युवती जिल्हाध्यक्ष सानिका पाटेकर उपस्थित होत्या.