मुंबई : या राज्यात याआधीचे कुठलेही मुख्यमंत्री मराठा समाजाला देऊ शकले असते, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून भरभरून दिले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पाठीमागे सरकार उभे राहिल्याने टप्प्याटप्प्याने आज या महामंडळाच्या लाभार्थ्यांची संख्या एक लाख 80 हजारांपर्यंत पोहोचली आहे. अशा स्थितीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आपला तोल सांभाळला पाहिजे. टोकाची भूमिका घेऊन समाजाला वेठीस धरणे साफ चुकीचे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
2016 ला राज्यात मोठ्या प्रमाणावर मूक मोर्चे निघाले. त्यानंतर मुंबईत महामोर्चा झाला. पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्रात नव्हे, तर भारतातील आणि विश्वातील एवढ्या मोठ्या मोर्चाला सामोरे गेले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विशेष समिती गठित केली. त्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, त्याचा मुद्दा त्यांनी हाताळला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात मराठा समाजातील उद्योजक घडावेत, यासाठी नियमावलीत बदल केला. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था म्हणून सारथीची स्थापना केली, असे श्री. पाटील यांनी नमूद केले.
राज्यामध्ये विविध महामंडळांमध्ये वर्षानुवर्षे चाललेला गैरव्यवहार आणि गोंधळ टाळण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी बँकेमधून कर्ज आणि कर्जावरील व्याज महामंडळाकडून देण्याची योजना आणली. आजपर्यंत कधी नव्हे एवढा मोठा निधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिला. 2018 पासून ते आजपर्यंत कमीतकमी 2 हजार कोटी रुपये देण्यात आले. त्यातून एक लाख 80 हजार लाभार्थी झाले. राज्य सरकार या महामंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि मराठा उद्योजक घडवण्यासाठी राज्यात 18 हजार कोटींचे कर्जवाटप विविध विभागातील मराठा समाजाला देण्यात आल्याचा तपशील श्री. पाटील यांनी दिला.
श्री. पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंनी सुरु केलेल्या ”सारथी” च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्तीसाठी 1 लाख लाभार्थ्यांना कमीतकमी एक-एक कोटी रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत परदेशी शिक्षण, युपीएससी-एमपीएससी यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी, चांगले उद्योजक घडवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे, त्याचबरोबर विशेष बाब म्हणून महामंडळाच्या सात विभागीय कार्यालयांचीही स्थापना करण्यात आली.
अशा परिस्थितीत काही समाजकंटक जाणीवपूर्वक देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने उद्गार काढतात, याचे वाईट वाटते. या आंदोलनाची दिशा ही वेगळ्या धर्तीवर जात आहे. अशाप्रकारे टोकाची भूमिका घेऊन सणासुदीला उद्रेक करणे योग्य नाही. काही आंदोलनकर्ते सातत्याने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल जे बोलत आहेत ते योग्य नसल्याबाबत श्री. पाटील यांनी खेद व्यक्त केला.
मराठा समाज कधीच एकेरी भाषेत बोलत नाही. किंबहुना शिव्यांनी वार करत नाही. त्याच्यामुळे ते जे करताहेत, ते चुकीचेच आहे. त्यांनी त्यांच्यामध्ये बदल घडवावा. भाजपा आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जातेय, हे पटणारे नाही. ज्यांनी काम केले त्याचे तुम्हाला कौतुक करता येत नाही, हे समजू शकतो. पण ज्यांनी काम केले त्यांच्याबद्दल असे बोलणे हे मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना शोभत नाही, असेही श्री. पाटील यांनी सुनावले.