मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील CCTV वर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जात असताना मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीही चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
नवी दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात मोठा हंगाम खरिपाचा आहे, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पेरण्या उशिरा झाल्या आणि आता १ महिन्यापासून पाऊस नाही. जे पेरले ते उगवले नाही व जे उगवले ते करपून गेले आहे. पावसाने दडी मारल्यानंतर कृत्रिम पाऊस पडण्याबाबत सरकारने पाऊल उचलायला पाहिजे होते पण सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. वीज गायब होत असल्याने ज्या ठिकाणी पाणी आहे तेथिल शेतकऱ्यांना पिकाला पाणीही देता येत नाही. सरकारने आतापासूनच टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करावे. जनावरांना मिळणाऱ्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. एकही बळी जाऊ नये यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारच्या निकषाने शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
MPSC चा कारभार काही सुधारत नाही…
राज्यातील लाखो विद्यार्थी सरकारी नोकरी मिळावी, अधिकारी व्हावे अशी स्वप्ने उराशी पुण्यात लाखो विद्यार्थी एमपीएससीची तयारी करत आहेत, यात ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे पण MPSC च्या भोंगळ कारभाराने या विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. पेपरफुटी व अनागोंदी कारभाराने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, अनेकदा रस्त्यावर उतरून जाब विचारला तरीही MPSC चा कारभार काही सुधारत नाही. एमपीएससी चे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. मागच्या काळातील भ्रष्टाचारातील व्यक्तींना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपला मित्र एमपीएससीच्या अध्यक्षपदावर बसवला आहे. औषध निरीक्षक परीक्षेचा घोळ ताजा असतानाच आता गट- क चा पेपर आधीच फुटल्याचे समोर आले आहे, म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपरफुटीचा गुन्हा हा संघटित आहे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
खा.पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा..
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. हे प्रकरण मुख्यमंत्री यांनीच बाहेर आणलं होतं आता न्यायलयाने विचारणा केली, त्याचे उत्तरही फडणवीस यांनी द्यावे. या जमीन घोटाळ्यातील मूख्य सूत्रधार खासदार पार्थ पवार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
