चिपळूण : येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित नाट्यप्रयोगाला शेजारील मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेमुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सांस्कृतिक वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.

कोकणातील पहिले बंदिस्त सभागृह म्हणून ओळख असलेल्या या केंद्रात देवेंद्र पेम लिखित ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग रात्री साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र त्याचवेळी जवळील पवन तलाव मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान डीजे, स्पीकर आणि फटाक्यांचा मोठा आवाज सुरू होता.

या गोंधळामुळे नाट्यप्रयोग नियोजित वेळेत सुरू करता आला नाही. अभिनेते मयुरेश पेम, निखिल चव्हाण आणि मनमित पेम यांनी प्रेक्षकांशी चर्चा करून प्रयोग दहा वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही आवाज कमी न झाल्याने सादरीकरणात सातत्याने अडथळे निर्माण होत राहिले. मध्यंतरानंतर अभिनेते मयुरेश पेम यांनी प्रत्यक्ष मैदानावर जाऊन आवाज कमी करण्याची विनंती केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही काळ प्रयोग थांबवण्याची वेळही आली. तरीही कलाकारांनी सर्व अडचणींवर मात करत नाटक पूर्ण केले.

प्रयोगानंतर अभिनेते मनमित पेम यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओळख असलेल्या चिपळूणमध्ये अशा प्रकारे नाट्यप्रयोगात व्यत्यय येणे खेदजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेमुळे प्रशासनाने अशा कार्यक्रमांच्या वेळापत्रकात समन्वय साधण्याची गरज अधोरेखित झाली आहे.