मंडणगड : मंडणगड तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे नवीन बसस्थानक बांधण्यात येणार असून, त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले असून, नवीन बसस्थानकाच्या उभारणीमुळे तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंडणगड येथे केले.
दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी मंडणगड शहरातील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच तात्पुरत्या स्वरूपातील प्रवासी शेडचे लोकार्पण श्री. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना कदम म्हणाले की, समस्यांवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा त्या कायमस्वरूपी सोडवणे आणि त्यांचे दीर्घकालीन उत्तर शोधणे आवश्यक आहे, असे मी मानतो. त्यामुळे येथील सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता पाठपुरावा केला. नवीन इमारतीमुळे बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार असून, स्वच्छतागृहासह दीर्घकाळ रखडलेले अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.
आगामी काळात बसस्थानक परिसरात तालुक्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र मॉल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
केवळ बसस्थानकाची इमारत बांधून पुरेसे नाही, तर जुन्या बसेस बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आगाराच्या मागणीनुसार आवश्यक त्या नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याकरिता जागा निश्चित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
नगरपंचायतीच्या पाणीप्रश्नावर भाष्य करताना कदम म्हणाले की, पाणी योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून लवकरच योजनेचे काम सुरू करण्यात येईल. तसेच शहरातील प्रत्येक घरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, मंडणगड पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती अनंत लाखण, रामदास रेवाळे, शहरप्रमुख विनोद जाधव, तहसीलदार अक्षय ढाकणे, आगारप्रमुख मदनीपाशा जुनेदी, दीपक घोसाळकर, हेमंत नटे, अनंत शिंदे, नितीन म्हामुणकर, सिद्धेश देशपांडे, संजय शेडगे, इरफान बुरोंडकर यांच्यासह तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसस्थानकाच्या नूतनीकरणामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय दूर होणार : गृहराज्यमंत्री योगेश कदम..
